Pune : स्वाइन फ्ल्यूचे नवीन 17 रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज – शहरातील स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असून, स्वाइन फ्ल्यूचे नवीन 17 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्या वाढत असून, वाढत्या साथीच्या आजारांमुळे शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये तत्काळ जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सर्दी, तापखोकला आणि घसा दुखत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. तसेच डेंग्यू आणि मलेरिया या आजाराने सध्या डोके वर काढले असून अशक्तपणा, अंगदुखी, गुडघेदुखी असल्यास आवश्यक त्या तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आल आहे.

शहरातील मागील आठ दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. रविवारी सुटी असली तरीही दिवसभरात केवळ 117 व्यवतींची तपासणी करण्यात आली. त्यात स्वाइन फ्ल्यूचे 17 रुग्ण आढळले असून, 55 व्यक्ती संशयित म्हणून आढळून आल्या आहेत. त्यांना टॅमी पलूचे औषध देऊन घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अतिदक्षता विभागात 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 65 जणांवर वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मागील दोन महिन्यांत पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे स्वाइन फ्लूने पुन्हा डोकं वर काढले आहे. मागील 10 महिन्यांत 41 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 481 रुग्णांना लागण झाली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात दोन महिन्यांत 8 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, 75 जणांना लागण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्यानंतर स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.