Pune : आठ विधानसभा मतदारसंघात 31 लाख पुणेकर मतदार ; उद्या बजावणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 30 लाख 94 हजार 150 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत 50 टक्केही मतदान झाले नव्हते. यावेळी 2 दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान वाढविणे हे प्रशासनासमोर आव्हानच आहे. सर्वात जास्त मतदार हडपसर मतदारसंघांत आहे. तर, सर्वात कमी मतदार कसबा मतदारसंघांत आहेत.

वडगावशेरी मतदारसंघात 4 लाख 56 हजार 487, शिवाजीनगर 3 लाख 5 हजार 587, कोथरूड 4 लाख 4 हजार 765, खडकवासला 4 लाख 86 हजार 948, पर्वती 3 लाख 54 हजार 292, पुणे कॅन्टोन्मेंट 2 लाख 91 हजार 344, कसबा पेठ 2 लाख 90 हजार 683, हडपसर 5 लाख 4 हजार 44, असे एकूण 30 लाख 94 हजार 150 पुणेकर मतदार आहेत. 100 टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, पुणेकर बोलण्यात जास्त आणि मतदान करण्यात निरुत्साह दाखवित असल्याचे मागील वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते. यावेळी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आजची रात्र ही खूप महत्त्वाची आहे. या रात्रीतच पुढील 5 वर्षांचे सरकार ठरणार आहे. सध्या सर्वच उमेदवारांच्या डोळ्यांची झोप उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.