Pimpri : भाजपमध्ये गेल्यानंतर चित्रा वाघ यांचे मानसिक संतुलन ढासळले – रुपाली चाकणकर

वर्ध्यातील दुर्घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी - चाकणकर

एमपीसी न्यूज – जसा गुन्हा तशी शिक्षा झाली पाहिजे अशी माझी महिला म्हणून मागणी आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील दुर्घटनेतील आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली. तसेच अस्तित्व टिकवण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. ज्यांचे संतुलन ढासळले आहे. त्यांच्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही. देव त्यांना सदबुद्धी देवो इतकी प्रार्थना त्यांच्यासाठी मी करेन असेही त्या म्हणाल्या.  

पिंपरी-चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा चाकणकर यांनी आज (गुरुवारी)  घेतला. त्यानंतर आकुर्डीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेविका अनुराधा गोफणे, संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे, विनया तापकीर, कविता खराडे आदी महिला उपस्थित होत्या.

वर्धा येथे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना चाकणकर म्हणाल्या, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील पीडित मुलीने दुर्घटनेतून सावरावे. बाहेर पडावे, प्रकृती स्वास्थ मिळावे यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक समाजातील घटक तिच्यासाठी प्रार्थना करत आहे. पण, तिथे भाजपच्या महिला नेत्या आल्या. त्यांनी गाजावाजा करत, मोठ्याने बोलत होत्या. खोट्या गोष्टी समोर मांडण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्या तिथे येऊन राजकारण करत होत्या. एखादा माणून आयुष्य जगण्याचा संघर्ष करत आहे. त्यासाठी राजकारण करु नका, प्रार्थना करा. राजकारण करण्यासाठी बाकीची बरीच ठिकाणे आहेत. त्यांनी नको त्या गोष्टीचे राजकारण करु नये.

आपल्या हाताला काही लोणी, तूप लागेल म्हणून चित्रा वाघ भाजपमध्ये गेल्या. पण, दुर्दैवाने त्या तिकडे गेल्यामुळे भाजपची सत्ता गेली. त्यामुळे हातात काही न मिळाल्याने वाघ यांचे मानसिक संतुलन ढासळल्यासारखे झाले आहे, अशी टीकाही चाकणकर यांनी केली. दक्षता कमिटी सक्षम करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.