Pune : पासपोर्ट व्हिजाची मुदत संपूनही अवैधरित्या राहणा-या पाच नायजेरियन व्यक्तींवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पासपोर्ट व्हिजाची मुदत संपूनही अवैधरित्या राहात असलेल्या पाच नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली. यात दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एका व्यक्तीवर दिल्लीत फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याचे पासपोर्ट कोर्टाकडे जमा आहे.

केहिंद केटरिना, नामायोम्बा रिताह, टोनी अडजेमीओ, इक्वर जॉर्ज ओसारमेन, दाईक चिडीएमेरे, अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक पूर्व विभाग तसेच विशेष शाखेकडील परदेशी नागरिक नोंदणी विभागाकडील अधिकारी व कर्मचारी तसेच एमओबी विभागाकडील डॉग स्कॉड यांना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान स्काय हाईट्स पिसोळी, उंड्री येथे नायजेरियन नागरिक पासपोर्ट व व्हिजाची मुदत संपलेली असताना सुद्धा राहत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीनुसार मंगळवारी दुपारी चार वाजता या ठिकाणी छापा टाकला असता पाचही आरोपी पासपोर्ट व्हिजाची मुदत संपूनही राहत असल्याचे आढळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलेआरोपी दाईक चिडीएमेरे याच्यावर दिल्ली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून त्याचे पासपोर्ट दिल्ली न्यायालयात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली. ताब्यात घेतलेल्या पाचही आरोपींची अन्य चौकशी करून त्यांना पुढील कारवाईसाठी एफआरओ शाखेच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस निरीक्षक विजय टिकोळे व पोलीस स्टाफ, एफ आर ओ ब्रँच कडील स्टाफ तसेच एमओबी विभागाकडील डॉग स्कॉड यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.