Pune : पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील आरोपींचा जामीन मंजूर

एमपीसी न्यूज – झेंडेवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असताना पकडलेल्या एकूण सहा संशयित आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये किरण रावसाहेब काळे, सचिन रावसाहेब पवार, सचिन चंद्रकांत पवार, संतोष कांतीलाल पवार, गोपाळ किसन पवार आणि सुरज तेजसिंग बगाडे या सहा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी.सी. भगुरे यांनी काल जामीन मंजूर केला आहे. 
याप्रकरणी शुक्रवारी (दि. 28 जून) पुणे ते सासवड मार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होत असताना रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे एक पथक दिवे घाट मार्गावरती पेट्रोलिंग करत असताना दिवे घाटाच्या माथ्यावर्ती व हॉटेल व्ही के च्या पाठीमागे 5 ते 6 संशयित व्यक्ती असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या पुणे ग्रामीणच्या गुन्हे शोधक पथकाने तीन आरोपींना दारोड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्त्यारासह या घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते व उर्वरित इतर तीन आरोपींना इतर ठिकाणाहून ताब्यात घेऊन सर्व संशयित आरोपींवरती सासवड पोलीस स्टेशन येथे भा द वि कलम 399 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सर्व संशयित आरोपींना सासवड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. त्यामुळे जामीन मिळावा म्हणून सर्व संशयित आरोपींनी अॅड शिवाजी शेलार, अॅड.मयूर जगताप, अॅड. ललिता झेंडे आणि अॅड. प्रिती दळवी-मिटकर यांच्या मार्फत पुणे सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. त्यास विरोध करताना आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांना जामिनावर सोडू नये, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत, “फक्त इतर गुन्हे दाखल असल्याच्या कारणामुळे आरोपींचा जामीन फेटाळला जाऊ शकत नाही व आरोपी हे गरीब घरामधील असून ते मोलमजुरी करून पोट भरत असून त्यांच्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी त्यांच्यावरती आहे. त्यांनी कोणताही गुन्हा केला नसून त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अॅड.शिवाजी शेलार आणि अॅड.मयूर जगताप यांनी केला. तो मान्य करत सत्र न्यायालयाने सर्व आरोपींचा जामीन मंजूर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.