Talegaon Dabhade : संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्याला 48 तासात अटक

22 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेतील संघवी ज्वेलर्समधील चोरी प्रकरणातील चोरट्यांना पोलिसांनी फिर्याद दाखल झाल्यापासून अवघ्या ४८ तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

शंकर लक्ष्मी सिन्हा (वय २० रा. टाकवे बुद्रुक ता. मावळ ,मूळ रा. तेजपूर, गुवाहाटी, आसाम), असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. गुरुवारी त्यला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयायीन कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली. याप्रकरणी दुकानाचे मालक अशोक जव्हेरचंद ओसवाल (वय ५६,रा.तळेगाव दाभाडे) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

संघवी ज्वेलर्स या दुकानाचे शटर्स उचकटून चोरट्याने सुमारे २२ लाख रुपये किमतीच्या सोन्या – चांदीचे दागिने लांबविले. ही घटना सोमवारी रात्री घडली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद झाला. पोलिसांनी श्वान पथक ठसे तज्ज्ञांना पाचारण करून पोलीस पथकांनी कामशेत, कान्हे, वडगाव मावळ व टाकवे बुद्रुक आदी परिसर पिंजून काढला. बुधवारी (दि.२) सायंकाळी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यास टाकवे बुद्रुक येथून मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. चोरट्याकडून ५६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, १ किलो ४४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, लॅपटॉप, २ गजलक्ष्मी मूर्ती, १ ग्रॅम टेम्परी ज्वेलरी २ नग असा चोरीत गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार बंडू मारणे, राजेंद्र बोरसे, अमोल गोरे, मनोज गुरव, विकास तारू, आकाश भालेराव, गणेश आंबवणे, सतीश मिसाळ, लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.