Pimpri : “फोन अ फ्रेंड”, “पोलीस आपल्या दारी” संकल्पना राबवणार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

एमपीसी न्यूज – पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये कायम सुसंवाद राहायला हवा. पोलीस यंत्रणा समाजात समाजासाठी काम करत आहे, याचा अनुभव नागरिकांना यायला हवा. पोलीस पोलीस ठाण्यात नाही तर समाजात दिसायला हवेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘फोन अ फ्रेंड’ आणि ‘पोलीस आपल्या दारी’ या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिली.

फोन अ फ्रेंड

आयुक्त म्हणाले, “शहरात एखादी घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला त्या घटनेची माहिती द्यावी. नियंत्रण कक्षातून संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकाला याबाबत माहिती देऊन घटनास्थळी पाठविण्यात येईल. घटनास्थळावर किमान एक पथक पोहोचेल. घटनेची तीव्रता लक्षात घेत पथकांची संख्या वाढेल. एका पथकामध्ये किमान सात पोलीस कर्मचारी असणार आहेत. काही ठिकाणी आयुक्तालयाचे देखील पथक घटनास्थळी जाणार आहे. प्रत्येक घटनेला पोलीस प्रतिसाद देत असल्याचे लक्षात येऊन याचा गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.”

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक – 020-2745 0888/ 020-27450666

पोलीस आपल्या दारी

आयुक्त म्हणाले, “नागरिकांच्या तक्रारी आणि वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईसाठी ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. मोठ्या वसाहती, पोलीस चौकी आणि अन्य ठराविक ठिकाणी तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात टाकाव्यात. त्या तक्रारी ठराविक दिवशी वाचून पोलीस त्याबाबत त्वरित कारवाई करतील. तसेच त्याबाबत आवश्यक ती माहिती तक्रारदाराला देतील.

वाहतूक विभागाकडून करण्यात येणा-या कारवाया आणि त्यांचे दंड वसूल करण्यासाठी देखील या संकल्पनेचा उपयोग होणार आहे. एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याबाबत वाहतूक विभाग पुरावे जमा करून थेट वाहन मालकाच्या घरी जाऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही योजना पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येणार आहे.”

पेइंग गेस्ट आणि महिला वसतिगृहांचा आढावा घेणार

आयुक्त म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिक नगरी म्हटले जाते. तसेच शहरात आयटी इंडस्ट्री देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात भाड्याने राहणा-या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेइंग गेस्टची संकल्पना देखील शहरात मोठ्या प्रमाणात रूढ होत आहे. नोकरी करणा-या व शिक्षण घेणा-या महिला व मुली महिला वसतिगृहात राहतात. अशा भाडेकरू, पेइंग गेस्ट आणि महिला वसतीगृहाचा पोलिसांकडून आढावा घेतला जाणार आहे. नोकरी करणा-या, शिक्षण घेणा-या मुलींवर अतिप्रसंग किंवा त्यांना येणा-या अडचणी यामुळे पोलिसांना समजतील आणि त्यांना त्यातून सोडविण्यास पोलीस मदत करू शकतील. या संकल्पनेतून हा आडवा घेतला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.