New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे भारतात टेन्शन वाढले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ब्रिटनमधून आलेल्या विमानांमधील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणीत दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, अमृतसर आणि चेन्नई विमानतळावर 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळलेला नाही.

सोमवारी रात्री 11.30 वाजता लंडनहून आलेले विमान दिल्लीत लँड झाले. त्यात पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आणखी एक प्रवासी चेन्नईत गेला. तेथील विमानतळावर चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजता दिल्ली विमानतळावर लंडनहून आलेल्या दुसऱया विमानात 199 प्रवासी होते. सर्व प्रवासी निगेटिव्ह आढळले.

ब्रिटनहून गुजरातमध्ये अहमदाबाद विमानतळावर आलेल्या विमानात पाच प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोलकाता विमानतळावर ब्रिटनहून आलेल्या विमानात दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ब्रिटनहून अमृतसर विमानतळावर आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांची चाचणी केली. त्यात 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये काही क्रू मेंबर आहेत.

 नव्या स्ट्रेनवरही लस प्रभावी !

सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले, नवीन लसीमध्ये अँटीबॉडीजसारख्या पैलूंमध्ये फरक पडू शकतो. व्हायरसचे परिवर्तन झाले म्हणजे लस निष्क्रिय ठरेल असा अर्थ काढू नये. लस तितकीच प्रभावी ठरेल. त्यामुळे चिंता करू नये.

कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती शरीरात अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी झाली आहे. व्हायरसचे परिवर्तन झाले म्हणून लस उपयोगी ठरणार नाही, असा निष्कर्ष काढता येत नाही, असे वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.