New Delhi : पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 12 नवीन TV चॅनेल सुरू होणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी सरकारने 2 महिन्यांत 3 चॅनेल सुरु केले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी रविवारी (दि.17) दिली. तसंच पुढील काही दिवसात आणखी 12 चॅनेल शाळांसाठी सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी, शिक्षकांचे लाईव्ह वर्ग या चॅनेलवर दाखवले जाणार आहेत. हे चॅनल टाटा स्काय व एअरटेलहीवरही दाखवले जातील. सरकारने ई-पाठशालांतर्गत 200 नवी पुस्तकं आणली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रांसाठी या पॅकेजमधून घोषणा करत आहेत. या टप्प्यातील अखेरची पत्रकार परिषद त्यांनी रविवारी (दि.17) घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

मानव संसाधन विकास मंत्रालयाने कोरोना संकटाच्या वेळी शैक्षणिक उपक्रम सुरु ठेवण्यासाठी घेतलेल्या कार्यक्रमांविषयी पंतप्रधानांशी झालेल्या बैठकीनंतर यावर काम सुरु केले आहे. सध्या या योजनेला ‘पंतप्रधान ई-विद्या’ असे नाव देण्यात आले आहे.

मंत्रालयाकडे उपस्थित असलेल्या स्वयंप्रभाच्या 32 वाहिन्यांमधून या सर्व वाहिन्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या यापैकी अनेक वाहिन्या यूजीसी, एनआयओएस, इग्नू यासारख्या संस्थांना देण्यात आल्या आहेत.

मानव संसाधन विकास मंत्रालयाने अभ्यास तयार करण्याचे काम NCERT कडे सोपवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि TV च्या माध्यमातून ते सर्वांना मोफत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.