New Delhi: गुड न्यूज! देशातील 300 जिल्हे कोरोनामुक्त तर 197 जिल्हे ‘नॉन-हॉट स्पॉट’ – डॉ. हर्ष वर्धन

एमपीसी न्यूज – भारतातील कोविड-19च्या विरोधातील लढाई तीव्र होत असतानाच देशातील तळागाळापर्यंतची परिस्थिती वेगाने सुधारत आहे. देशातील किमान 300 जिल्हे कोरोनामुक्त झाले असून 197 जिल्हे ‘नॉन-हॉट स्पॉट’ झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.

डॉ. हर्ष वर्धन यांच्या मते, हॉट स्पॉट जिल्हे (एचएसडी) आता नॉन-हॉट स्पॉट जिल्हे (एनएचएसडी) होण्याकडे वाटचाल करत आहेत. “गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्या दुप्पट होण्याचा दर साडेदहा दिवसांपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे. एकंदरच देशातील परिस्थिती सुधारत आहे.

हॉटस्पॉट जिल्हे नॉन-हॉटस्पॉट जिल्ह्यात रुपांतरित होत आहेत. गेल्या सात दिवसांत 66 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे कोणतेही नवीन प्रकरण समोर आलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 48 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. 31 जिल्ह्यांत गेल्या 21 दिवसांत तर 16 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. देशातील एकंदरित 300 जिल्हे हे कोरोनामुक्त अथवा संसर्गविरहित आहेत. 197 नॉन- हॉट स्पॉट जिल्हे आहेत. त्यातील बऱ्याच ठिकाणी तर जेमतेम एक किंवा दोन कोरोना रुग्ण आहेत, असे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.

देशात आतापर्यंत एकूण 26 हजार 917 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांपैकी एकूण 826 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड-19 वर मात करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेतली. कोविड रूग्णांच्या विलगीकरणाची सुविधा असलेल्या विविध वॉर्डांना त्यांनी भेट दिली. कोरोनाबाधित रूग्णांशी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एम्समधील सुविधांविषयी त्यांचा अभिप्रायही जाणून घेतला.

देशातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी प्रभावी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. हर्ष वर्धन यांनी केले. दरम्यान, कोरोना विरुद्ध लढ्याच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी कॅबिनेट सचिवांनी सर्व मुख्य सचिव आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांशी आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like