Cyclone Alert : ओदिशा व प. बंगाल किनारपट्टीला बुधवारपर्यंत एम्फन चक्रीवादळ धडकण्याचा इशारा

Cyclone Alert : Amphan cyclone is expected to hit India's east coast up to Wednesday

एमपीसी न्यूज – बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचे एम्फन चक्रीवादळात (Amphan Cyclone) रूपांतर होण्याची शक्यता असून येत्या बुधवार (20 मे) पर्यंत ते ओदिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि भरतीच्या लाटा येण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक शनिवारी झाली. 

बैठकीत संबंधित राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी चक्रीवादळामुळे उद्भवणार्‍या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकारांनी मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निवाऱ्याची सोय करण्यात आली असून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आवश्यक परिसराची पाहणी करण्यात आली आहे.

एनडीआरएफ, सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दल यांना सतर्क करण्यात आले असून ते राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. त्यांनी सर्व तयारीचा स्वत: आढावा घेतला आहे. गृह मंत्रालय, राज्य सरकारे आणि संबंधित संस्थांच्या सतत संपर्कात आहे. कॅबिनेट सचिवांनी सद्य परिस्थिती आणि बचाव तसेच मदत कार्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यकतेनुसार तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला गृह, संरक्षण मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयएमडी, एनडीएमए आणि एनडीआरएफचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि  अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.