New Delhi : रामायणानंतर आजपासून ‘श्रीकृष्ण’ प्रेक्षकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज : ‘रामायण’,महाभारत या मालिकांनंतर आता दूरदर्शन वाहिनीवर ‘श्रीकृष्ण’ ही मालिका प्रदर्शित होणार आहे. ही मालिका आज रात्री ९ वाजता म्हणजे रामायण मालिकेच्या वेळेतच दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दूरदर्शन वाहिनीने ट्विटरद्वारे दिली आहे.

एकेकाळी दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणा-या ‘रामायण’,महाभारत या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आबालवृद्ध सगळ्यांना या मालिका मनापासून आवडत असत. त्यावेळी इतर चॅनेल नसल्याने या मालिकांची मोहिनी होती. मात्र, करोनाच्या युद्धकाळात पुन:प्रसारित होणा-या रामायण, महाभारतातील प्रसंग प्रेक्षकांना कधी भावुक करत होते तर कधी युद्धप्रसंगात लहान मुले रमून जात होती.

त्यानंतर उत्तर रामायण म्हणून ओळखली जाणारी लव- कुश ही मालिका छोट्या पडद्यावर पुन्हा दाखवण्यात आली. त्याचा शेवटचा भाग काल प्रदर्शित झाला. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे मालिकेची प्रशंसा देखील केली. पण आता कोणती मालिका पाहायची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण दूरदर्शनने प्रेक्षकांच्या आवडीचा विचार करुन रामानंद सागर यांची आणखी एक मालिका प्रेक्षकांसाठी पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता दूरदर्शन वाहिनीवर ‘श्रीकृष्ण’ ही मालिका प्रदर्शित होणार आहे. ही मालिका आज रात्री ९ वाजता म्हणजे रामायण मालिकेच्या वेळेतच दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दूरदर्शन वाहिनीने ट्विटरद्वारे दिली आहे. ‘वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ आज रात्री ९ वाजता श्री कृष्ण ही मालिका पाहा दूरदर्शन वाहिनीवर’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राम, कृष्ण हे भारतीयांची आदराची व्यक्तिमत्वे आहेत. एकाने संयम शिकवला तर दुस-याने कर्मसिद्धांत शिकवला. सध्याच्या तरुणाईला या निमित्ताने का होईना आपल्या युगपुरुषांची नव्याने ओळख होत असल्याचे समाधान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.