New Delhi : भारतातील रेल्वे प्रवासी सेवा 31 मार्चपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – भारतातील सर्व रेल्वेगाड्या 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. दरम्यान, मालगाड्यांची सेवा सुरु राहणार आहे. रविवारी (दि. 22) मध्यरात्री पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

रेल्वे विभागाने आज, रविवारी (दि. 22) याबाबत पत्रक काढले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जगभरात विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यात बाधित व संशयित व्यक्तींनी रेल्वेने प्रवास केल्यास त्याचा धोका मोठ्या प्रमाणत संभवतो. यामुळे रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला देशभरातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी टाळणे हा मोठा खबरदारीचा उपाय आहे. त्यामुळे देशभरात ठिकठिकाणी दुकाने, परिवहन सेवा आणि अन्य सर्व बाबी बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने देखील सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी (दि. 22) मध्यरात्रीपासून भारतातील प्रवासी रेल्वे सेवा 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, मालवाहतूक सेवा सुरु राहणार आहे. उपनगरीय आणि कोलकाता मेट्रो रविवारी मध्यरात्री पर्यंत सुरु राहतील. त्यानंतर या सेवा देखील बंद राहणार आहेत. केवळ रविवारी दुपारी चार पर्यंत रेल्वे स्थानकातून सुटणा-या रेल्वेगाड्या आपला प्रवास पूर्ण करणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.