New Delhi : तिन्ही सैन्यदलांनी दिली कोरोना योद्ध्यांना मानवंदना!

एमपीसी न्यूज – पायदळ, हवाई दल आणि नौसेना या तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आज (रविवारी) देशभर कोरोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आज तिन्ही सैन्य दलाकडून मानवंदना देण्यात आली. डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयीन कर्मचारी, पोलीस, शासानाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधी कोरोनाविरोधात लढत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या योद्ध्यांच्या शौर्याला तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात आली.  

प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाबाहेर लष्कराकडून विशेष बॅण्ड वादन करून कोरोना योद्ध्यांना सलामी देण्यात आली. भारतीय वायू सेनेतर्फे फ्लाय पास्टचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात येत आहे. यामध्ये भारताची अत्याधुनिक लढाऊ विमाने व वाहतूक विमानांचा समावेश आहे. भारतीय नौदलांकडून या योद्ध्यांना समुद्रातूनही सलामी देण्यात येणार आहे. यावेळी 24 बंदरांवरील जहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. गुजरातच्या पोरबंदर, मुंबई, गोवा, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकता येथील बंदरावर संध्याकाळी सात वाजता आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल.

भारतात आत्तापर्यंत 10 हजार 18 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी 26.52 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, ही दिलासादायक बातमी आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या 37 हजार 776 इतकी झाली असून आत्तापर्यंत 1,223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूदर 3.24 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशभरात करोनाचं संकट संपलेलं नाही. रुग्णसंख्या रोज वाढते आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.