New Delhi: अमित शहा म्हणतात, ‘त्या’ अफवांमुळे आपल्या आयुष्याची दोरी अधिक बळकट झाली!

New Delhi: Amit Shah says, 'those' rumors have strengthened the rope of his life!

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत शहा यांनी आज स्वतः ट्वीट करून खुलासा केला. मी पूर्णपणे निरोगी आहे, मला कोणताही आजार झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या अफवांमुळे माझे आरोग्य अधिक चांगले झाले असून आयुष्याची दोरी अधिक बळकट झाली आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी संबंधितांना लगावला आहे.  

अमित शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  गेल्या कित्येक दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या तब्येतीबद्दल कपोलकल्पित अफवा पसरविल्या आहेत. बर्‍याच लोकांनी तर माझ्या मृत्यूसाठी देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रार्थना केल्या.

देश कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून रात्री उशिरापर्यंत मी कामांमध्ये व्यस्त असल्याने मी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले नाही. मला हे समजले तेव्हा मला वाटले की, हे सर्व लोक त्यांच्या काल्पनाविलासचा आनंद घेत आहेत. म्हणून मी त्याबाबत काहीही खुलासा केला नाही.

माझ्या पक्षाचे लाखो कार्यकर्ते आणि माझे हितचिंतक बर्‍यापैकी आहेत. त्यांनी चिंता व्यक्त केली, मी त्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज मी हे स्पष्ट करू इच्छित आहे की, मी पूर्णपणे निरोगी आहे आणि मला कोणताही आजार नाही.

हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की, या प्रकारची अफवा आरोग्य सुदृढ करतात आणि आयुष्याची दोरी लांबवतात. म्हणून मी त्या सर्व लोकांकडून आशा करतो की, त्यांनी मला माझे काम करु द्यावे आणि त्यांनी त्यांचे काम करावे.

माझे हितचिंतक आणि सर्व कार्यकर्ते यांनी माझ्या आरोग्याबद्दल काळजीने, आपुलकीने चौकशी केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या अफवा पसरविणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनात कोणतीही वाईट भावना किंवा द्वेष नाही, असेही शहा यांनी शेवटी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.