New Delhi : केंद्रातही भाजप-शिवसेना काडीमोड, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत राजीनामा देणार

एमपीसीए न्यूज- राज्यामध्ये भाजप बरोबर काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना केंद्रामधील सत्तेमध्ये राहणार का ? अशी चर्चा रंगू लागली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी असलेले शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. आज सकाळी 11 वाजता दिल्ली येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे ट्विट अरविंद सावंत यांनी केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. दोघाना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा हा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे ? म्हणूनच मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे.

या संदर्भात आज सकाळी 11 वाजता अरविंद सावंत दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.