New Delhi: ‘बेटा… आज तुला न्याय मिळाला!’, निर्भयाच्या आईला झाल्या भावना अनावर!

नवी दिल्ली : ‘मी मुलीचा फोटो छातीशी धरला आणि म्हटलं, बेटा तुला आज न्याय मिळाला, मला माझ्या मुलीवर गर्व आहे. आज जर ती या जगात राहिली असती, तर मी एका डॉक्टरची आई म्हटली गेली असती’, या शब्दांमध्ये निर्भयाच्या आई आशादेवी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. 

निर्भया बलात्कार व खून प्रकरणातील चारही दोषींना आज पहाटे साडेपाचला फाशी देण्यात आली. फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आई आशादेवी यांच्या घराजवळ लोक व माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने जमा झाले होते. घरातून बाहेर येऊन आशादेवी यांनी सर्वांशी बोलल्या. त्यावेळी त्या भावूक झाल्या होत्या.

‘मी देशभरातील महिलांना आवाहन करते की, देशातील कोणात्याही मुलीवर अन्याय होत असेल, तर अन्यायाशी लढताना त्यांना जरूर साथ द्या. देशातील मुलींसाठी माझा संघर्ष सुरूच असणार आहे, मी पुढेही हा लढा सुरू ठेवणार आहे, आजपासून देशातील मुली स्वत:ला सुरक्षित वातावरणात आहोत असं समजतील,’ असं त्या म्हणाल्या.

‘देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच चारही दोषींना एकाच वेळेस फाशीवर लटकवण्यात आले आहे. माझ्या मुलीला उशीरा का असेना पण न्याय मिळाला आहे. आज देशातील मुलींना न्याय मिळाला आहे. देशातील न्यायव्यवस्थेचे मी आभार मानते, त्यांनी दोषींचे कोणत्याही प्रकारचे मान्य केले  नाही. मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की, या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी पीडित निर्भयाची आई आशा देवी आणि त्यांना या कठीण प्रसंगात साथ देणारी त्यांची बहीण सुनीता देवी, निर्भयाची न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकील सीमा कुशवा यांनी दोषींना फासावर लटकवल्यानंतर समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.