New Delhi: महाराष्ट्रात 205, केरळात 202 तर भारतात 1124 कोरोनाबाधित

एंमपीसी न्यूज – महाराष्ट्र व केरळ या दोन राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने द्विशतक पूर्ण केले आहे. महाराष्ट्राचा आकडा 205 तर केरळचा आकडा 202 पर्यंत जाऊन पोहचला आहे. भारतात काल कोरोनाबाधितांचा आकडा 132 ने वाढून 1,124 झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांपैकी 118 जण बरे झाले आहे. देशातील 31 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात काल 19 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 205 झाला आहे. आतापर्यंत 28 कोरोना निगेटीव्ह झालेल्या रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. मृतांचा आकडा आठ झाला आहे. केरळमध्ये काल नवीन 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 202 झाली आहे. उपचारांनी आतापर्यंत 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

महाराष्ट्र व केरळनंतर कर्नाटक, उत्तरप्रदेश, दिल्ली व तेलंगणा या चार राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. राजधानी दिल्लीमध्ये काल एका दिवसांत नवीन 23 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 72 वर जाऊन पोहचला आहे. दिल्लीत आतापर्यंत दोन कोरोनात्बाधितांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये 83 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशात एकूण 80 रुग्ण आढळून आले आहेत. त्या राज्यात मात्र अजून तरी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. तेलंगणात 70 रुग्ण असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 58 रुग्णांची नोंद आहे.

राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमधील कोरोना रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे. व्यतिरिक्त मध्यप्रदेश (39), जम्मू काश्मीर (38), पंजाब (37), हरियाना (32), आंध्रप्रदेश (21), बंगाल (21) या राज्यातही कोरोनाचा प्रसार बऱ्यापैकी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.