New Delhi : पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना ‘कोरोना’ची बाधा; प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जाणार

एमपीसी न्यूज – चीन देशातून नव्याने मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या ‘कोरोना’ लागण व्हायरसचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तरीही भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. यात पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे.याच पार्श्वभूमीवर परदेशात, भारतात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक नागरिक, प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, आतापर्यंत फक्त 12 देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात होती. मात्र, यापुढे जगभरातील देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक नागरिक, प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे 25 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 16 नागरिक इटलीतून आलेले आहेत. तर, कोरोनाच्या 3 रुग्णांवर उपचार होऊन ते घरी परतले आहेत. देशातील सर्वच प्रमुख रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आतापर्यंत देशातील सर्वच विमानतळांवर मिळून सुमारे 5,89,000 जणांची तपासणी केली आहे. तर, तर प्रमुख आणि साधारण असलेल्या बंदरांवरही (पोर्ट) 15 हजार प्रवाशांची चाचणी केली आहे. तर, मंगळवारपर्यंत नेपाळ सीमारेषेवर 10 लाख लोकांची तपासणी केल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय राबविण्यात येत आहेत. यासाठी पुण्यात कंट्रोल रूम बनविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे.

भारत देशात दिल्ली, केरळ आणि तेलंगणा येथे ‘कोरोना’ व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. याचा प्रादुर्भाव रोखणे, हाच प्रमुख उपाय ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे देशासह, महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य यंत्रणेनेही विविध कामे हाती घेतली आहे. यात जपान, चीन, हाँगकाँग आदी देशातून आलेल्याचे प्रथम स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.