New Delhi : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला राष्ट्रीय सर्वेक्षणात ‘कायाकल्प-2019’ पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय आरोग्य मिशन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाच्या सर्वेक्षणात पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्र देशात सर्वोत्तम ठरले आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील ‘कायाकल्प 2019’ हा पुरस्कार देऊन हॉस्पिटलचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान करण्यात आला.

संस्थेचे ट्रस्टी डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी श्री अश्विनी कुमार चौबे राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण, प्रीती सुदान, सचिव – आरोग्य व कुटुंब कल्याण , डॉ. बी. के राव, अध्यक्ष एन ए बी एच व इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यावर्षी प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेसाठी देशातील ६५३ खाजगी रुग्णालयांचाही सर्वेक्षणास सहभाग केला होता. रुग्णसेवेचा दर्जा, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैविक कचर्याचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, स्वच्छता जनजागृती, आदी प्रमुख घटकांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. यात डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलने सर्वाधिक गुण प्राप्त केले व सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळवला. कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी डॉ. यशराज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलने ही कामगिरी केली.

“राष्ट्रीय पातळीवरचा देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळणे, हा फक्त आमच्या हॉस्पिटलचा बहुमान नसून महाराष्ट्राचा तसेच आमच्या पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीचाही बहुमान आहे. पिंपरीसारख्या उद्योगनगरीत जागतिक स्तरावरील सोयीसुविधांनी युक्त हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उभारण्याचे माझे स्वप्न होते. ते पूर्ण होतानाच राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. मी अजिबात अतिशयोक्ती न करता सांगतो की, या हॉस्पिटलला आजवर देश-विदेशातील असंख्य मान्यवरांनी भेट दिली आणि प्रत्येकजण येथील सुविधा पाहून थक्क झाला आहे. सध्याच्या काळात अतिशय भयावह आजार बळावले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना त्यावरील उपचार अजिबात परवडणारे नाहीत. अशा काळात केंद्र व राज्य शासनाच्या रुग्णसेवेच्या सर्व योजना या हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येतात. रुग्णांना सर्वाधिक सुविधा देणारे हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे हॉस्पिटल आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.