Editorial: लॉकडाऊनला एक महिना पूर्ण… काय साध्य केले भारताने?

एमपीसी न्यूज (विवेक इनामदार) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला मध्यरात्रीपासून देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा तो लॉकडाऊन आणखी 19 दिवसांसाठी वाढविण्यात आला. भारतात लॉकडाऊन सुरू होऊन आज एक महिना पूर्ण होत आहे. या महिनाभराच्या लॉकडाऊनमधून भारताने काय साध्य केले, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. त्याचे उत्तर हेच मिळते की, जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे.

भारताने जागाच्या तुलनेत तसेच प्रगत देशांच्या तुलनेत कोरोनाला खूप चांगल्या प्रकारे रोखून धरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे 20 एप्रिलपासून देशातील अनेक भागातील लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाचा जागतिक मृत्यूदर 7.01 टक्के इतका आहे. अमेरिकेत कोरोनाचा मृत्यूदर 5.7 टक्के आहे. भारताने मात्र तो 3.12 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश मिळविले आहे. जागतिक लोकसंख्येचा विचार करता 10 लाख लोकसंख्येत कोरोना संक्रमणाचे प्रमाण 300 आहे. अमेरिकेत दर दहा लाख लोकसंख्येमागे 2600 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात हेच प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे केवळ 17 असल्याचे दिसून येते.

चाचण्या वाढूनही कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण मर्यादित

अमेरिकेसारख्या प्रगत देशांनी कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात केल्यामुळे त्या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या तेवढ्या जास्त प्रमाणात वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. या देशातील चाचण्यांचे व त्यातील पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण लक्षात घेतले तर ते भारतापेक्षा काही पटींनी जास्त असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 47 लाख 74 हजार 828 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 18.57 टक्के चाचण्याचे अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण 1.05 टक्के आहे. भारतात आतापर्यंत 5 लाख 542 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 4,61 टक्के चाचण्यांचे अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत तर चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण हे केवळ 0.14 असल्याचे दिसून येत आहे.

जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक म्हणजे 32.55 टक्के कोरोनाबाधित हे अमेरिकेत आहेत तर कोरोनाबाधितांच्या यादीत भारताचा क्रमांक 16 वा लागतो. जगातील कोरोनाबाधितांपैकी केवळ 0.86 टक्के रुग्ण हे भारतात आहेत.

अमेरिका व युरोपमधील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारताने लवकर आणि कडक उपाययोजना केल्यामुळे भारताला कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनची घोषणा करून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न भारताने केला. भारतात कोरोनाच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी दोन्हींचा वाढीचा वेग जगातील प्रगत राष्ट्रांपेक्षा खूप कमी असल्याचे दिसून येते.

लॉकडाऊनमुळे जीवितहानी कमी करण्यात यश 

भारतात 24 एप्रिलला लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 536 तर मृतांची संख्या केवळ 10 होती. एक महिन्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 039 तर मृतांची संख्या 710 झाली आहे. जगाचा विचार करता 24 एप्रिलला 4 लाख 23 हजार 116 असणारी कोरोना रुग्णांची संख्या महिन्यानंतर 27 लाख 26 हजार 194 वर जाऊन पोहचली आहे. तर मृतांचा आकडा 19 हजार 71 वरून एक लाख 91 हजार 74 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत 24 मार्चला 55 हजार 398 कोरोनाबाधित होते तर मृतांचा आकडा 957 होता. एक महिन्यानंतर अमेरिकेत रुग्णसंख्या आठ लाख 86 हजार 709 वर पोहचली आहे तर मृतांचा आकडा 50 हजार 243 वर जाऊन धडकला आहे.

अन्य प्रगत देशांपैकी स्पेनने कोरोनाबाधितांचा दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे, इटलीने पावणेदोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. फ्रान्स व जर्मनीने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनने सव्वालाखाचा तर टर्कीने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. या सर्व देशांमधील मृतांची आकडेवारी देखील छातीत धडकी भरवणारी आहे. या सर्व देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असल्याचे दिसून येत आहे. भारताची लोकसंख्या या सर्व देशांपेक्षा खूप मोठी आहे. तरी देखील भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या, कोरोना प्रसाराचा वेग आणि मृत्यूदर मर्यादित ठेवण्यात भारताला यश आले आहे. भारताने सरसकट चाचण्या करण्याऐवजी संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहे. त्यामुळे वास्तविक चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त असणे अपेक्षित होते, प्रत्यक्षात ते खूपच कमी आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

कोरोनामुक्तीच्या दिशेने…

भारतातील 19 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले असून ही टक्केवारी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सुमारे 80 टक्के कोरोनाचे रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, ही मोठी आशादायक गोष्ट आहे.  देशातील 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्याचबरोबर गेल्या 28 दिवसात तब्बल 12 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, मागील आठवड्यात हा आकडा 4 होता.

संपूर्ण देश कोरोनामुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी सर्वांनी लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, वैयक्तिक आरोग्याची काळजी यांचे पालन करणे आवश्यक आहे. देशातील सध्याच्या लॉकडाऊनची मुदत तीन मेला संपणार आहे. त्यानंतरही काही दिवस लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे भारताचे मोठे आर्थिक नुकसान होत असले तरी प्रत्येक जीव हा अमूल्य आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक जीव हा  आर्थिक नुकसानापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.

देश एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत असताना दुर्दैवाने अजूनही काहीजण कुरघोडीचे राजकारण करताना दिसत आहेत. हे अजून काही काळ बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने कोरोनाची लढाईत लढली पाहिजे, जिंकली पाहिजे. ‘कोरोनामुक्त भारत’ हे ध्येय दृष्टीपथात येऊ लागले आहे. कोरोनावरील औषध व लस देखील लवकरच उपलब्ध होण्यासारखी परिस्थिती आहे. आता गरज आहे ती थोडा धीर धरण्याची! धीर सुटला तर मात्र हातातोंडाशी आलेला घास जाण्याचा धोका आहे. ‘कोरोनाचा वाईट प्रकोप तर पुढेच आहे’ आणि ‘कोरोना विषाणू अजून बराच काळ आपल्यासोबत असणार आहे’, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी दिला आहे. तो खोटा ठरविण्याची क्षमता भारतीयांमध्ये नक्कीच आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.