New Delhi : अखेर लढाऊ राफेलचे अंबाला एअरफोर्स स्टेशनवर लँडिंग

Finally the fighter Raphael landed at Ambala Air Force Station

एमपीसीन्यूज : फ्रान्सहून राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी अंबालाच्या एअरफोर्स स्टेशनवर आज, दाखल झाली असून, ती लवकरच वायू दलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे.  त्यामुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार आहे.

सोमवारी (दि. 27 ) फ्रान्समधून ही 5 विमाने भारताच्या दिशेने रवाना झाली होती. अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने संयुक्त अरब अमिरातीच्या फ्रेंच तळावर उतरली. तेथे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले.

फ्रान्समधून निघालेली राफेल फायटर विमाने हरयाणामधील अंबाला बेसवर उतरली आहेत.  नौदलाने राफेलच्या वैमानिकांना  ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौकेबरोबर संपर्क साधला व पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले.

फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली.

राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. 20 ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.

भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या या 36 राफेल विमानांमुळे देशातील राजकीय वातावरण काही दिवसांपूर्वी खूप तापले होते. त्यावेळी काँग्रेसने मोदी सरकार विरोधात वातावरण चांगलच तापवलं होते.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारने 2010 साली राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेला फ्रान्समध्ये सुरुवात केली.

त्यानंतर 2012 ते 2015 दरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये या वरून वाटाघाटी सुरू होत्या. दरम्यान 2014च्या लोकसभा निवडणुकीत यूपीए सरकार सत्तेवरून पायउतार झाले. त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले.

36 राफेल विमानांसाठीच्या तब्बल 59 हजार कोटींच्या फ्रान्ससोबतच्या करारावर सप्टेंबर 2016 मध्ये भारताने स्वाक्षऱ्या केल्या.

यूपीए सरकारने राफेल जेट विमानाची किंमत 600 कोटी ठरवली होती. त्यानंतर मोदी सरकारने हा करार अंतिम करताना एका राफेलची किंमत 1600  कोटी ठरविल्याचा आरोप केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.