New Delhi : जनरल मनोज नरवणे यांनी स्वीकारली भारतीय लष्करप्रमुख पदाची सूत्रे

एमपीसी न्यूज- पुण्याचे सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नरवणे यांच्या हाती लष्करप्रमुखपदाची सूत्रे सोपवली. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस विशेषतः एक पुणेकर लष्कराच्या सर्वोच्चपदी आज विराजमान झाला आहे. माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नेमणूक लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) म्हणून करण्यात अली असून याबाबतची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.

नरवणे मूळचे पुण्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एनडीए मधून लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. जून 1980 मध्ये ते ‘7 सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात दाखल झाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय रायफल्सचे त्यांनी नेतृत्व केले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू येथील लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे.

नरवणे यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी असून त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.