New Delhi: Good News! देशातील 30 टक्के रुग्णांनी केली कोरोना विषाणूवर मात!

New Delhi: Good News! 30% of patients in the country overcome the corona virus!

एमपीसी न्यूज – देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याची एक चांगली बातमी हाती आली आहे. त्याच बरोबर देशातील कोरोनाचा मृत्यूदर 3.3 पर्यंत मर्यादित ठेवण्यातही भारताला यश आले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

भारतातील 17 हजार 847 रुग्णांनी कोरोनाच्या विषाणूचा पराभव करून विजय मिळविला आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत हे प्रमाण 29.9 म्हणजेच जवळजवळ 30 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी एका दिवसात 1,307 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे.

देशात आतापर्यंत 15 लाख 25 हजार 631 कोरोना निदान चाचण्या झाल्या असून त्यापैकी 59 हजार 662 जणांचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. देशात शनिवारी एका दिवसात 3,320 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंता काही प्रमाणात वाढली आहे. देशभरात शनिवारी 95 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 1981 पर्यंत वाढली आहे.

कोरोनामुक्त झालेले रुग्ण आणि मृतांची संख्या वगळता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 39 हजार 834 झाली आहे. शनिवारी या संख्येत 1,918 रुग्णांची वाढ झाली. देशातील विविध रुग्णालयांमध्ये या सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 95.33 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचा सौम्य आजार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे. 1.88 टक्के रुग्णांना प्राणवायू पुरवावा लागत आहे. 2.41 टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर 0.38 टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती देखील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना निदान चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने केले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच मृत्यूदर मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असून नागरिकांना घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. शासनाकडून वेळोवेळी देण्यात येत असलेल्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.