New Delhi: दिलासादायक! कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात 40 टक्के घट – आरोग्य मंत्रालय

शेतीच्या कामांना लॉकडाऊनमधून वगळले

एमपीसी न्यूज –  देशात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात 40 टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 15 मार्च ते 31 मार्च या कालावधीत आढळलेले नवे रुग्ण आणि एक एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले नवे रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे. आपण कोरोना निदान चाचण्यांची संख्या वाढवली आहे, तरीही करोना रुग्ण वाढीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे, असे आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी दर तीन दिवसांना कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढ होती. आता रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी 6.3 दिवसांचा कालावधी लागत आहे. हे केवळ लॉकडाऊनमुळेच शक्य झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

करोना रुग्णांची संख्या काल 1,007 ने वाढून 13 हजार 387 झाली आहे. तर 24 तासांत 23 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांची संख्या 437 झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 1,749 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण कोरोनाबाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 13.6 टक्के आहे. आपण करोनाशी कसोशीने लढा देत आहोत असेही ते म्हणाले.  देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 11 हजार 201 झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेतीच्या कामांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असल्याची महत्त्वाची घोषणाही या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मुंबईत 12 तासांत केवळ 6 नवे कोरोना रुग्ण, पुण्यात 23 नवे रुग्ण

मुंबईत नवीन कोरोना रुग्ण वाढीच्या वेगात कमालीचा कमी झाला आहे. गेल्या 12 तासांत राज्यात मुंबईत केवळ सहा नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2,449 झाला आहे. पुण्यात आज नवीन 23 रुग्ण, मालेगावमध्ये नवीन चार रुग्ण तर ठाणे येथे एक नवीन रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्याकडून मिळाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like