New Delhi – आयटी, बीपीओ कंपनीच्या कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’साठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ- रविशंकर प्रसाद

एमपीसी न्यूज – माहिती तंत्रज्ञान (आयटी), बीपीओ कंपनी कर्मचार्‍यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. विविध राज्यांच्या आयटी क्षेत्रातील मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. सुरवातीला देण्यात आलेली ही मुदत या महिन्याच्या 30 तारखेला समाप्त होत होती.

केंद्रीय कायदे व न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, सध्या आयटी क्षेत्रातील 85 टक्के कर्मचारी घरातून काम करीत आहेत.

सरकारने कर्मचार्यांना घरून काम करण्यासाठी मुभा दिली आहे व कामाचे निकष देखील शिथिल केले आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ हा एक नवीन आदर्श बनवा अशी आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी यासाठी एक मोबाइल अ‍ॅप विकसित करण्याची सूचना केली आहे.

हि सूचना विचारात घेण्यात आली असून नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (एनईजीडी) आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) तीन दिवसांत यासाठी अ‍ॅप तयार करणार असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.