New Delhi : कोरोनाशी महायुद्ध – जनता कर्फ्यूस प्रारंभ; स्वयंस्फूर्त प्रतिसादाने देशभर कडकडीत संचारबंदी

एमपीसी न्यूज – कोरोना विरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूच्या सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला आहे. नागरिकांकडून स्वयंस्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण देशात कडक संचारबंदी सुरू झाली आहे. शहरातील सर्व रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी आज पूर्ण शुकशुकाट अनुभवायला आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 315 झाली आहे. कोरोनाने आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काल 12 ने वाढून 64 झाली आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराची साखळी मोडण्यासाठी जनता कर्फ्यू महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे देशवासीयांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी वगळता सर्वांनी सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान घरामध्येच अथवा आहे त्या ठिकाणीच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी रविवारी जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असले तरी त्या बाबतीत आज खरी कसोटी आहे ती देशवासीयांच्या निर्धाराची. सकाळी 7 ते रात्री 9 या कालावधीमध्ये चिंता, भीती न बाळगता संयमाची परीक्षा जनतेला द्यायची असून नागरिकांनी प्रशासन यंत्रणांना सहकार्य करणे अभिप्रेत आहे.

राज्यातील नवीन १२ रुग्णांमध्ये मुंबईतील आठ आणि पुण्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. तर यवतमाळ आणि कल्याण येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दरम्यान, राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. मुंबईतील उपनगरी रेल्वेतील गर्दी कमी होणार नसेल तर नाइलाजाने ती सेवा बंद करण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही टोपे यांनी दिला.

देशात करोनाचे नवे रुग्ण आढळले असून सरकारने या विषाणू संसर्गाच्या चाचणी निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. यापुढे करोना चाचणी करताना परदेश प्रवासाचा इतिहास नसला तरी न्यूमोनियाच्या रुग्णांचा संशयित रुग्णांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. देशात करोना विषाणूबाधितांची संख्या वेगाने वाढत असून शनिवारी 60 नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 315 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. बाधितांमध्ये 39 परदेशी नागरिक आहेत.

रुग्णांची संख्या अचानक वाढली असली तरी महाराष्ट्र अद्याप करोना फैलावाच्या दुसऱ्या टप्प्यातच आहे. परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. गर्दी टाळावी, सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासारख्या महानगरांतून आपापल्या गावी जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाल्याचे दिसले. त्यामुळे रेल्वेगाडय़ा वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबईत उपनगरी रेल्वेतील गर्दी कमी होत असली तरी अद्याप ती म्हणावी तितकी ओसरलेली नाही. गर्दी ओसरणार नसेल तर मुंबईत उपनगरी रेल्वेसेवा बंद करण्याबाबत सरकारला विचार करावा लागेल, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

राज्यात शनिवारी परदेशातून आलेल्या 275 प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण 1861 प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत 1592 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 1208 जणांना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले, तर 64 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

चीनमध्ये साथीवर नियंत्रण मिळविण्यात यश?

जगभर करोना विषाणूचा फैलाव वेगाने होत असला तरी त्याचा उद्रेक झालेल्या चीनच्या वुहान शहरात गेल्या24 तासांत एकही नवा रुग्ण आढळला नसल्याने तेथे साथ आटोक्यात येत असल्याचे सुचिन्ह आहे. इटलीमध्ये मात्र शुक्रवारी627 रुग्ण दगावले. जगभरातील बळींची संख्या11 हजारांवर गेली असून 2 लाख 75 हजार लोकांना संसर्ग झाला आहे.

राज्यात एकूण 64 कोरोनाबाधित रुग्ण

मुंबई – 19

पिंपरी चिंचवड – 12

पुणे – 11

नागपूर – 4

कल्याण – 4

यवतमाळ – 4

नवी मुंबई – 3

अहमदनगर – 2

रायगड – 1

ठाणे – 1

उल्हासनगर – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.