New Delhi : निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद फरार; पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेश राज्यात रवाना

एमपीसी न्यूज – करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरीही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. मात्र, साद फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.मोहम्मद साद यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेश राज्यात पाठविली आहेत. तसेच त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी एका प्रसारमाध्यमाला दिली आहे.

मोहम्मद साद यांनी त्यांचा मोबाइल बंद ठेवला आहे. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना लागेना, अशी स्थिती आहे. त्याची एक ऑडिओ क्लिप नुकतीच समोर आली होती. ज्यामध्ये त्याने आपण विलगीकरणात असल्याचा दावा केला होता.

दिल्ली पोलिसांनी २४ मार्चच्या अगोदर मर्कझमधून बाहेर पडलेल्या सर्व भारतीयांची एक यादी तयार करायला सांगितली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८२४ परदेशी नागरिकांसहित शेकडो भारतीयांनी दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मर्कझमध्ये आले होते. दिल्ली पोलीस या सर्वांची माहिती तपास यंत्रणांसोबत शेअऱ करत आहेत. त्यांचा ठावठिकाणा शोधून क्वारंटाइन करण्यात येणार आहे. मर्कझमध्ये हजर असलेल्यांना उपचारासाठी दाखल केले आहे, अशा पोलीस त्या १४ रुग्णालयांच्या संपर्कातही आहेत.

या सर्वांना रुग्णालयातून सोडल्यानंतर जबाब नोंदवला जाणार आहे. पोलिसांकडून मशिदीतून २३६१ जणांना बाहेर काढण्यात आले असून यामधील ६०६ जणांमध्ये ‘करोना’ची लक्षणं आढळली. कार्यक्रमाला हजर असणाऱ्यांपैकी शेकडो जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गर्दी केल्याप्रकरणी आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने मोहम्मद साद आणि तबलिगी जमातच्या इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.