New Delhi: देशात 1,993 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांच्या पुढे, मृतांची संख्या 1,152 वर

एमपीसी न्यूज – सध्या कोविड19 च्या देशातील एकूण रुग्णांची संख्या 35,043 इतकी आहे. कालपासून यात 1,993 रुग्णांची भर पडली. कोरोनाबाधित मृतांची संख्या 1,152 वर पोहचली आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 8,888 झाली असून बरे होण्याचा दर 25.37% पर्यंत वाढला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 25 हजार 148 झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रितपणे आणि सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्यासोबत बैठक घेतली. आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि केंद्र तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अॅक्युट एन्सेफलायटीस सिंड्रोम म्हणजेच मेंदूज्वराचे व्यवस्थापन आणि राज्यातील कोविड-19 ची स्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशातील सर्व जिल्हे आता हरित, केशरी आणि लाल अशा क्षेत्रात (झोन) वर्गीकृत करण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच जिल्हा प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करुन ज्या जिल्ह्यात (म्हणजेच रेड आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यात) रुग्णांची संख्या अधिक आहे,  तिथे प्रभावी उपाययोजना आणि प्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करुन संक्रमण साखळी तोडण्यासाठी लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.  प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करताना, रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले लोक, भौगोलिकदृष्ट्या रुग्ण कोणकोणत्या भागात पसरले आहेत, भागाच्या निश्चित परीघासह संपूर्ण परिसर, आणि अंमलबजावणीचा आवाका अशा सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकात नमूद केले आहे.

नागरी भागात निवासी वसाहत/ मोहल्ले/ महापालिका वार्ड किंवा पोलीस स्टेशनचा भाग/ महापालिका क्षेत्र/ गावे आणि ग्रामीण भागात खेडी/ खेड्यांचा समूह किंवा पोलीस ठाण्याचे क्षेत्र/ ग्रामपंचायती/ गट इत्यादी क्षेत्र अशा सीमा कंटेंनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करता येतील, अशी सूचना राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे.

या कंटेनमेंट क्षेत्रांच्या बाहेर बफर क्षेत्र तयार करुन त्यांच्या सीमा निश्चित केल्या पाहिजेत. या परिघात कठोर नियंत्रण, विशेष पथकांद्वारे घरोघरी निरीक्षण करुन रुग्णांचा शोध, नमुन्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व रुग्णांची तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन व्हायलाच हवे. तसेच बफर क्षेत्रात, ILI/ SARI च्या रुग्णांवर देखरेख ठेवत, आरोग्य व्यवस्थांमध्ये निरीक्षण अधिक तीव्र करुन रुग्णांचा शोध घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोविड-19 ची संक्रमण साखळी तोडण्यासाठी, हातांची स्वच्छता पाळणे आवश्यक असून त्यासाठी हात साबणाने वारंवार धुणे, ज्या वस्तूंना किंवा पृष्ठभागांना आपण वारंवार स्पर्श करतो, असे पृष्ठभाग, वस्तू सतत स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणे, संगणक टेबल, खुर्च्यांचे हात इत्यादीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  मास्क वापरणे किंवा चेहरा झाकणे, कोरोनाचा मागोवा घेणारे “आरोग्य सेतू” अॅप डाऊनलोड करणे आणि शारीरिक अंतराचे नियम पाळणे, अशा  सवयी नियम म्हणून पाळणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.