New Delhi:देशात नवे 826 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 759 तर मृतांची संख्या 420 वर

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासात 826 करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत तर 28 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातली करोना रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 759 झाली असून मृतांचा आकडा 420 वर जाऊन पोहचला आहे. 

देशात करोनाच्या रुग्णांची संख्या 12 हजार 759 एवढी झाली आहे. आतापर्यंत एकूण 1,514 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशभरात करोनामुळे 420 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेबरोबरही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

मृत्यूंचे प्रमाण कमी

देशात लॉकडाउनचा कालावधी तीन मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. गेल्या २४ तासात २८ मृत्यूंची नोंद झाली आहे. मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

325 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

देशातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती आज आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेशी चर्चा झाल्याचेही मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवरील माहितीनुसार भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 024 असून त्यापैकी 1 हजार 659 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 429 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून कोरोनाचे 10 हजार 936 सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा तीन हजारच्या वर गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.