New Delhi News : पवार-मोदी भेटीने चर्चांना उधाण ; राष्ट्रवादी -शिवसेनेकडून ‘हा’ खुलासा

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे जवळपास एक तास चर्चा झाली. दरम्यान, पवार-मोदी  भेटीची आम्हाला कल्पना होती, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले, तर ही पूर्वनियोजित असल्याचा खुलासा राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

यापूर्वी पवार आणि मोदी या दोन्ही नेत्यांची भेट नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेच्या घडामोडी सुरु असताना संसदेत पंतप्रधान कार्यालयात झाली होती. त्यानंतर सतरा- अठरा महिन्यानंतर दोघांमध्ये ही भेट झाली आहे. भेटीचा तपशील अजून गुलदस्त्यात असला तरी सहकार आणि बँकिंगसंदर्भातल्या प्रश्नांवर ही चर्चा झाल्याचे समजते.

या भेटीसंदर्भात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे देशाचे माजी कृषीमंत्री व संरक्षणमंत्री आहेत. तसेच ते सहकार क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व आहे. शरद पवार हे मोदींना भेटले, याची आम्हाला सगळ्यांना कल्पना होती. सध्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात काही सूडाच्या कारवाया सुरु आहेत. त्यासाठीच भेट घेतली का, हे शरद पवारच सांगू शकतील.

तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथील भेट पूर्वनियोजित होती. या भेटीची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनाही होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.