New Delhi News : पेट्रोल प्रतिलीटर 19 पैसे तर डिझेल 14 पैशांनी महाग : कासवगतीने इंधन दरवाढ

एमपीसी न्यूज : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरात वाढ केली. पेट्रोलचे दर 19 पैशांनी तर डिझेलचे दर 24 पैशांनी वाढविण्यात आले आहेत.

ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्‍लीतील पेट्रोलचे लिटरचे दर 81.70 रुपयांवरुन 81.89 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 71.62 रुपयांवरुन 71.86 रुपयांवर गेले आहेत.

तेल कंपन्यांनी गेल्या आठवडाभरापासून बुधवार वगळता दररोज इंधनाच्या दरात वाढ केली आहे. आठवडाभरात पेट्रोलचे दर 83 पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे 1.40 पैशांनी वाढले.

देशातील अन्य शहरांचा विचार केला तर मुंबईत पेट्रोलचे दर 88.58 रुपयांवर गेले असून डिझेलचे लिटरचे दर 78.38 रुपयांवर गेले आहेत. चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोलचे दर क्रमशः 84.91 व 83.44 रुपयांवर गेले आहेत.

दुसरीकडे डिझेलचे दर क्रमशः 77.30 व 75.43 रुपयांवर गेले आहेत. दिल्‍लीला लागून असलेल्या नोएडामध्ये पेट्रोल व डिझेलचे दर क्रमशः 82.28 आणि 72.27 रुपयांवर गेले आहेत.

झारखंडमधील रांची येथे पेट्रोल 81.40 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 76.07 रुपयांवर गेले आहेत. कर्नाटकातील बंगळुरु येथे पेट्रोल 84.63 रुपयांवर गेले आहे तर डिझेल 76.18 रुपयांवर गेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.