PM Address To Nation : राज्यांनी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाउनकडे पाहावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज – ‘आजच्या स्थितीत देशाचा लॉकडाऊनपासून बचाव करायचा आहे. राज्यांनी सुद्धा लॉकडाऊनच्या निर्णयापासून बचाव करत त्याचा फक्त अंतिम पर्याय म्हणून वापर करावा’,  असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी, दि.20) देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील नागरिकांना धीर देतानाच कोरोनासाठी देश पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी देखील माहिती दिली.

 

पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही करोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं होतं. आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल, असं मोदी म्हणाले.

‘माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोविड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये.

प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायच आहे. राज्यांनी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा’, असं पंतप्रधान म्हणाले.

कोरोना काळात देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे. सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.

यावेळी कोरोनाचे रुग्ण वाढताच देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले’.

एक मे पासून अठरा वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध झाल्यामुळे अठरा वर्षांवरील पात्र सर्वांना तसेच, श्रमिकांना लस उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारांनी मजुरांना विश्वास द्यावा की ते जिथे आहेत, तिथेच त्यांनी थांबावं. गेल्या वेळची परिस्थिती आत्तापेक्षा फार वेगळी होती. तेव्हा आपल्याकडे या संकटाशी लढण्यासाठी उपाय नव्हता.

देशानं कोरोनाविरोधात आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने लढा दिला आहे. त्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना जातं. या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी, आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.