New Delhi News : हाथरस बलात्कार पीडितेच्या व्हायरल फोटोचे सत्यः पीडित म्हणून वर्णन केलेली मुलगी चंडीगडची मनीषा; दोन वर्षांपूर्वी आजारामुळे झाला होता मृत्यू

वकील अनिल गोगना म्हणाले- बलात्कार पीडिताबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक करणे हा दंडनीय गुन्हा आहे

एमपीसीन्यूज : हाथरसमध्ये दलित मुलीसोबत घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश संतप्त आहे. या घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी जोर धरत आहे. सामूहिक बलात्कार झालेली मुलगी दलित असल्याचे सांगत एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. पण प्रत्यक्षात दाखविलेला फोटो चंडीगडमधील मनीषाचा आहे.

मनीषा यादव यांचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. हाथरस बलात्कार प्रकरणात चंडीगडच्या मनिषाचे छायाचित्र व्हायरल करण्यात केवळ सामान्य जनताच नाही, तर मोठमोठे सेलिब्रिटीसुद्धा गुंतले आहेत. नकळत चंदीगडची मुलगी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर अन्याय केला जात आहे.

मनीषाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करुन देशातील लोक शोक व्यक्त करत असतील, पण याचा फटका मनीषाच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे. आपल्या लहान मुलीचे निघून जाण्याचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करीत वडिलांच्या जखमा या निमित्ताने पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

मनीषा यादव यांचे कुटुंब रामदरबार कॉलनीत राहते. 21 जून 2018 रोजी मनीषाचे लग्न झाले होते. त्यांना मुतखडा हा आजार होता आणि हा आजार दिवसेंदिवस वाढत गेला. यातच 22 जुलै 2018 रोजी मनीषा यांचे निधन झाले.

मनीषाचे वडील मोहन लाल यादव म्हणाले की, मुलीच्या निधनानंतरही तिची निंदा केली जात आहे, याबद्दल मला अतिशय वाईट वाटते. मोहन लाल यांनी बुधवारी यासंदर्भात चंदीगडच्या एसएसपीला तक्रार दिली. सोशल मीडियावर व्हायरल होण्यापासून आपल्या मुलीचे फोटो रोखले जावेत. जर कोणी हे करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली.

अधिवक्ता अनिल गोगना म्हणाले की, बलात्कार पीडित महिलेबद्दल कोणतीही माहिती जाहीर करणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्यास आयपीसीच्या कलम 228 (अ) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. या कलमान्वये दोषींना शिक्षा आणि दोन वर्षांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.