New Delhi News : केंद्र सरकार म्हणते लाॅकडाऊनमध्ये मरण पावलेल्या स्थलांतरितांची आकडेवारी उपलब्ध नाही

काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा यावरून मोदी सरकारवर निशाणा

एमपीसी न्यूज – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. लाॅकडाऊनमध्ये किती स्थलांतरितांचे मृत्यू झाले आणि किती स्थलांतरितांना केंद्राच्या वतीने नुकसान भरपाई दिली गेली, हे दोन प्रश्न अधिवेशनाच्या पहिल्या काही तासात पटलावर आले, त्याला केंद्रीय श्रम कल्याण आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने लिखित स्वरुपात उत्तरे दिली गेली. त्यात केंद्राचे म्हणणे आहे की, अशा स्वरुपाचा कोणताही तपशील सरकारकडे उपलब्ध नाही.
लाॅकडाऊनमध्ये किती स्थलांतरितांचे मृत्यू झाले याची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच, लाॅकडाऊन काळात किती जणांचा रोजगार गेला याची आकडेवारी देखील सरकारकडे उपलब्ध नाही असे केंद्र सरकारने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

दरम्यान, यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘लाॅकडाऊनमध्ये किती स्थलांतरितांचे मृत्यू झाले व किती जणांचा रोजगार गेला याची आकडेवारी मोदी सरकारकडे उपलब्ध नाही. तुम्ही मोजले नाही तर मृत्यू झाले नाही का ? पण सरकारवर काही परिणाम झाला नाही याचं दुःख आहे. त्यांचं मरण जगाने पाहिले, एक मोदी सरकार आहे ज्यांना ही माहिती नाही’ असे ट्विट गांधी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.