New Delhi : बेशिस्त वाहनचालकांनो, वाहतुकीचे नियम मोडणे महागात पडणार !

राज्यसभेत मोटर वाहन दुरुस्ती विधेयक मंजूर

एमपीसी न्यूज- राज्यसभेमध्ये बुधवारी मोटर वाहन दुरुस्ती विधेयक- 2019 मंजूर करण्यात आले. प्रदीर्घ चर्चेनंतर 13 विरूद्ध 108 अशा फरकाने हे विधेयक मंजूर झाले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधेयक मांडले. वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहतुकीचे नियम मोडणे महागात पडणार आहे.

या विधेयकानुसार आता हेल्मेट न वापरणाऱ्या व्यक्तीस 100 रूपयां ऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय वाहनचालकाचं लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास दोन हजारांऐवजी आता दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. तसेच, गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास व परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास 5 हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. मोटर वाहन दुरुस्ती विधेयकाद्वारे राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही असे गडकरींनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केले.

आता वाहनचालकांना मोबाईलद्वारेच टोल भरता येणार आहे. त्यामुळे आता कुणालाही टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज पडणार नाही. वाहन चालवण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला घर बसल्याचं ऑनलाइन वाहन शिकत असल्याचा परवाना मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.