New Delhi : प्रत्येक सामान्य नागरिक कोरोना विरूद्धच्या लढाईचे नेतृत्व करत आहे – नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला. लॉकडाउनच्या काळात सर्वच यंत्रणा युद्ध पातळीवर लढत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील लढाई ही जनता केंद्रीत आहे. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. संपूर्ण देशात गल्लीबोळात लोक एकमेकांना मदत करत आहेत. जनतेसोबत शासन – प्रशासनही लढत आहे. भारताने आपल्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवले असून जगभरात याचे कौतुक होत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

मन की बातच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, भारतात कोरोनाविरोधातील लढाई जनता लढत आहेत. प्रत्येकजण या लढाईचे आपल्यापरीने नेतृत्व करत आहे. संपूर्ण जग करोनाविरोधात एकवटलं आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेनं याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल. लॉकडाउनच्या काळात देश कसा एकजूट झाला आहे. लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीनं लढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे.

कोरोनाविरोधात देशवासीयांनी संकल्पशक्ती दाखवली आहे. विमान आणि रेल्वेचे कर्मचारी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी होताना दिसत आहे. कुणी घरभाडं माफ करत आहे, कुणी मोफत किराणा देतो आहे.

शेतकरी शेतात रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, कुणी मदतीसाठी आपली पेन्शन देतंय, कुणी शेकडो गरिबांना मोफत जेवण देत आहे. दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुमच्या मनात असलेला भाव या लढाईला बळ देत आहे, असे मोदी म्हणाले.

कोरोनाविरोधात प्रत्येक घटकाचे योगदान असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले. covidwarriors.gov.in या पोर्टलवर सव्वा कोटी जण जोडले गेले आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक याच्याशी जोडले गेले आहेत. तुम्ही देखील याच्याशी जोडले जाऊन कोविड वॉरियर बना असे आवाहनही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.