New Delhi: पाकिस्तान भारतापेक्षा पुढे… कोरोनाबाधितांच्या संख्येत!

एमपीसी न्यूज – पाकिस्तान भारतापेक्षा पुढे आहे. आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण कोरोनाबाधित देशांच्या यादीतील ही क्रमवारी आहे. या यादीत पाकिस्तानचा क्रमांक 31 असून भारताचे नाव 41 व्या क्रमांकावर आहे. श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार व नेपाळ हे आपले शेजारी देश या यादीत खूप खाली आहेत.

कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये कोरोनाचा किती प्रसार झाला आहे, यावर एक नजर टाकूयात. आपल्या भारतात आतापर्यंत एकूण 1,023 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून देशातील कोरोना बळींची संख्या 24 आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1,493 वर जाऊन पोहचला आहे. कोरोना बळींची संख्या भारतापेक्षा निम्मी म्हणजे 12 आहे.

पाकिस्तानमध्ये आखाती देशात नेहमी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने झाल्याचे बोलले जाते. भारताप्रमाणे लॉकडाऊनसारखी कठोर उपाययोजना देखील पाकिस्तानने केलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणे अवघड जात आहे. भारताचा एकूण भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या यांची कोठेही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.

बांगलादेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 48 असून मृतांची संख्या पाच आहे. श्रीलंकेत एकूण 113 कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नेपाळमध्ये पाच तर म्यानमारमध्ये आठ कोरोना रुग्ण आढळले असून सुदैवाने तिथे आतापर्यंत कोरोनामुळे जीवितहानी झालेली नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.