New Delhi : उद्योगांना चालना देण्यासाठी 20 लाख कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज;   लाॅकडाऊन 4.0 सुद्धा लागू होणार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना आज (मंगळवारी) दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. तर लाॅकडाऊन 4.0 ची सुद्धा घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आज रात्री आठ वाजता देशवासीयांसोबत संवाद साधला. त्यात त्यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के असून या निधीतून देशातील वेगवेगळ्या घटकांना चालना मिळेल.

देशातील उद्योग क्षेत्राला विशेषतः लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना याचा फायदा होईल, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. देशातील कामगार, मध्यमवर्ग यांना याचा मोठा फायदा होईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ विषयी माहिती दिली जाईल. भारताला आत्मनिर्भर बनवणारे पाच स्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. यामध्ये अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, भारतीय व्यवस्था, लोकशाही आणि मागणी यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी आत्मनिर्भर भारत बद्दल बोलताना पुढे म्हणाले, एका विषाणूने जगात कहर घातला आहे. भारतात सुद्धा कोरोनाचे संकट वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. पण आपल्याला हार मानून चालणार नाही त्यासाठी भारताला ‘आत्मनिर्भर’ बणवण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. भारताने संकटाला वेळेत ओळखून संकटाला संधीत बदलले आहे.

भारतात कोरोना संकटाच्या सुरूवातीला एक सुद्धा पीपीई किट आणि एन 95 मास्क बनवण्यात सक्षम नव्हता पण आज घडीला देशात 2 लाख पीपीई किट आणि 2 लाख एन 95 मास्क निर्मिती केली जात आहे.

‘आत्मनिर्भर’ म्हणजे आत्मकेंद्री व्यवस्था नव्हे तर सर्व जगाची चिंता करणे असल्याचे मोदी म्हणाले. जगातलं सर्वोत्तम टॅलेन्ट भारताकडे असल्याचं ते म्हणाले.

लाॅकडाऊन 4.0  नवं रुप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात चौथा लाॅकडाऊन लागू होणार याचे स्पष्ट संकेत दिले असून याबाबत नवीन नियमावली आणि माहिती 18 मे पूर्वी जाहीर केली जाईल असे ते म्हणाले. मात्र हा लाॅकडाऊन 4.0 हा पूर्ण पणे आगळावेगळा असेल असे त्यांनी सांगितले.

या लाॅकडाऊनचे स्वरूप हे लाॅकडाऊन 3.0 पेक्षा वेगळे असणार आहे. लाॅकडाऊन 4.0 मध्ये काय शिथिलता दिली जाणार याबाबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून ठरवले जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.