New Delhi : पंतप्रधान मोदी आज रात्री पुन्हा कोरोनाविषयी राष्ट्राला संबोधित करणार

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना साथीसंदर्भात आज (मंगळवारी) रात्री आठ वाजता पुन्हा एकदा राष्ट्राला संबोधित करणार आहेत. मागील संबोधनात त्यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 500 पेक्षा अधिक झालेला असताना पंतप्रधान कोणती नवीन घोषणा करणार, याबाबत उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी देशभर जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. देशातील जनतेने कडकडीत बंद पाळून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. कोरोना विरोधात लढत असलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणा आदींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता टाळ्या वाजवाव्या, घंटानाद अथवा थाळीनाद करावा, या आवाहनालाही देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. काही अतिउत्साही लोकांनी त्यानिमित्ताने हुल्लडबाजी करून गालबोट लावले होते.

कोरोनाच्या लढाईची पुढील दिशा काय असेल, हे पंतप्रधान आज सांगतील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार असून त्यासाठी देखील पंतप्रधान देशातील दानशूरांना आवाहन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.