New Delhi: पंतप्रधान मोदी उद्या सकाळी नऊ वाजता देणार व्हिडिओ संदेश

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजता देशवासीयांना एक व्हिडिओ संदेश देणार आहेत. कोरोनाचे संकंट अधिक तीव्र बनत असताना मोदी कोणता नवा निर्णय जाहीर करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच ट्वीट करून ही माहिती देशवासीयांना दिली आहे. यापूर्वी मोदी यांनी प्रत्येकवेळी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी प्रथमच सकाळी नऊची वेळ निवडली आहे. नोटबंदी, जनता कर्फ्यू आणि 21 दिवसांचा लॉकडाऊन असे महत्त्वाचे निर्णय मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना जाहीर केले आहेत.

मोदी उद्या सकाळी कोणता व्हिडिओ संदेश देणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. कोरोनाविरुद्धची लढण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी एखादा मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी यांचा ‘छोटा व्हिडिओ संदेश’ हा कोरोनाबाबतच असणार, हे जवळजवळ निश्चित आहे. पण तो नेमका काय असणार, हे उद्या (शुक्रवार) सकाळी नऊनंतरच समजू शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.