New Delhi: कर्ज हप्तेवसुलीसाठी तीन महिने स्थगितीचा रिझर्व बँकेचा सल्ला, व्याजदरात कपातीचा निर्णय

एमपीसी न्यूज – करोना संसर्ग व देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज (शुक्रवार) केली. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहेत. कर्जाच्या हप्त्यांची वसुली तीन महिन्यांसाठी तात्पुरती स्थगित करण्याचा सल्लाही शक्तिकांता दास यांनी बँकांना दिला आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात 0.9 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर 4.9 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास यांनी केली. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.

रिझर्व्ह बँकेनं सीआरआर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांचा सीआरआर कमी करून तो 3 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बाजारात 3 लाख 74 हजार कोटी रूपये खेळते भांडवल उपलब्ध होईल, असेही दास म्हणाले.

तीन महिने ईएमआय स्थगित करा

कर्जाच्या हप्त्यांची वसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही शक्तिकांता दास यांनी बँकांना दिला आहे. एक मार्चला शिल्लक असलेल्या कर्जरकमेवर तीन महिने व्याजआकारणी करू नये. या कालावधीत हप्ते न भरल्यास त्यावर दंड आकारला जाऊ नये, असेही त्यांनी सुचविले आहे. या उपाययोजनांमुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.