New Delhi : दिलासादायक! देशातील 14 टक्के कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी !

नवे 991 रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14,378 तर मृतांचा आकडा 480 वर

एमपीसी न्यूज – देशातील 1992 कोरोनाबाधित रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 14 टक्के असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील 80 टक्के कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, अशी चांगली बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

भारतात आज नवीन 991 रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 378 झाली आहे तर गेल्या 24 तासांत 43 जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबाधित मृतांचा आकडा 480 पर्यंत जाऊन पोहचला आहे.

देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग 40 टक्क्यांनी घटल्याची सकारात्मक बातमी काल आरोग्य मंत्रालयाने दिली होती. आता अनेक चांगल्या बातम्या येण्यास सुरूवात झाली आहे. उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेले रुग्ण आता घरी परतू लागले आहेत. भारतात एकूण 1 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 13.85 टक्के म्हणजेच जवळजवळ 14 टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

देशातील 45 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याची गुड न्यूज देखील या पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांपैकी 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोना आजार हा सौम्य स्वरूपाचा असून ते उपचारांनी ते बरे होण्याच्या मार्गावर असल्याचेही सांगण्यात आले.

मृतांपैकी 75 टक्के वयाची साठी ओलांडलेले

भारतातील कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण हे 3.3 टक्के असून वयोगटानुसार मृतांचे विश्लेषणाची माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरोनाबाधित मृतांमध्ये 75 वर्षे व त्यावरील वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 42.2 टक्के तर 60 ते 75 वयोगटातील मृत रुग्णांचे प्रमाण 33.1 टक्के आहे. म्हणजेच साठी ओलांडलेल्यांचे एकूण प्रमण 75 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याची सूचना देशवासीयांना केली आहे. 45 ते 60 वयोगटातील मृत्यूंचे प्रमाण 10.3 टक्के तर शून्य ते 45 वयोगटातील मृतांचे प्रमाण 14.4 टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.