New Delhi: केवळ 12 दिवसांत उभारले 1000 खाटांचे सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालय

New Delhi: Sardar Vallabhbhai Patel covid Hospital with 1000 beds built in just 12 days संरक्षणमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री व दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची 250 आयसीयू खाटांची सुविधा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयास भेट दिली

एमपीसी न्यूज – सुमारे 250 आयसीयू खाटांसह एकूण 1000 खाटांची सुविधा असलेल्या दिल्लीतील सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालय आजपासून (रविवार) रुग्णसेवेत कार्यरत झाले. संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्यासह गृह मंत्रालय (एमएचए), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, सशस्त्र सेना, टाटा सन्स आणि इतर उद्योजक सहभागींनी 12 दिवसांच्या विक्रमी वेळेत ही सुविधा उभारली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी देखील होते.

रुग्णालयाला भेट दिल्यानंतर राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केले. एवढ्या कमी कालावधीमध्ये हे रुग्णालय उभारल्याबद्दल त्यांनी सर्व हिस्साधारकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. राजधानी दिल्ली मध्ये सध्या कोविड-19 च्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.

गृह मंत्रालय व संरक्षण मंत्रालय यांच्यात दिल्लीतील कोविड-19 रूग्णांसाठी असलेल्या रूग्णालयातील खाटांची क्षमता वाढवण्याच्या तात्काळ आवश्यकतेवर आणि 14 दिवसांपेक्षा कमी काळात 1,000 खाटांची सुविधा असलेले रूग्णालयाच्य उभारण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली होती.

या रुग्णालयाचा आराखडा तयार करणे, विकास आणि कार्यान्वयन हे सर्व युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले होते. भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) परवानगीने, नवी दिल्ली देशांतर्गत विमानतळ टर्मिनल टी 1 जवळील जमीन निश्चित करण्यात आली आणि डीआरडीओने 23 जून रोजी कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स (सीजीडीए) च्या मुख्यालयाला लागून असलेल्या उलान बतार रोड जवळील जागेवर बांधकाम सुरू केले.

सशस्त्र बल वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय पथकाद्वारे हे रुग्णालय चालविले जाईल, डीआरडीओद्वारे या रुग्णालयाची देखरेख केली जाईल. याव्यतिरिक्त, रूग्णांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, रुग्णालयात एक समर्पित डीआरडीओ व्यवस्थापित मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र देखील आहे.

जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोविड-19 रूग्णांवर या रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. वैद्यकीय स्थिती गंभीर असलेल्या रुग्णांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली येथे पाठविले जाईल.

टाटा सन्स यांनी या प्रकल्पाला अर्थसहाय्य देऊन मोठे योगदान दिले आहे. इतर योगदान कर्त्यांमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बीईएल), भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल), अस्त्र मायक्रोवेव्ह प्रॉडक्ट्स लिमिटेड (एएमपीएल), श्री वेंकटेश्वर अभियंता, ब्रह्मोस प्रायव्हेट लिमिटेड, भारत फोर्ज यांचा समवेश असून डीआरडीओच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने त्यांचा एक दिवसाचा पगार दिला आहे.

अद्वितीय केंद्रीय वातानुकूलित वैद्यकीय सुविधा असलेले हे रुग्णालय 25,000 चौरस मीटरवर उभारण्यात आले असून 250 आयसीयू खाटांसह सुसज्ज आहे. प्रत्येक आयसीयू खाटेजवळ मॉनिटरिंग उपकरणे आणि व्हेंटिलेटर आहे. सुरक्षित संसर्ग नियंत्रणासाठी या पायाभूत सुविधा केंद्रात निगेटिव्ह इंटर्नल प्रेशर ग्रेडियंट स्थापन करण्यात आले आहे. ऑक्टानॉर्म मॉड्यूलवर आधारित जलद फॅब्रिकेशन तंत्राचा वापर करुन ही सुविधा उभारण्यात आली आहे.

रूग्णालयात एक वेगळा रिसेप्शन-कम-पेशंट ब्लॉक, औषधाचे दुकान आणि प्रयोगशाळेसह वैद्यकीय ब्लॉक, कामावर असणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांची राहण्याची सोय आणि प्रत्येकी 250 खाटांची सुविधा असलेले चार मॉड्यूलर रूग्ण ब्लॉक्स आहेत. कॉरिडॉर नेटवर्कची रचना ही रुग्णाची ये-जा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींपासून वेगळी ठेवण्यासाठी केली गेली आहे. रुग्ण आणि सुविधा कर्मचाऱ्यांना स्वच्छता सुविधा आणि स्वच्छतागृहे यांचा वापर सहजगत्या करता यावा यासाठी ही सुविधा ब्लॉक च्या मध्ये उभारण्यात आली आहे.

रूग्ण ब्लॉक रुग्ण आणि वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांच्या सुविधांसह सुसज्ज आहेत. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन पुरवठा, एक्स-रे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी), रक्त चाचणी सुविधा, व्हेंटिलेटर, कोविड चाचणी प्रयोगशाळा, व्हील चेअर, स्ट्रेचर्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे यांचा समवेश आहे. डीआरडीओने गेल्या 3  महिन्यांत उद्योगांच्या सहाय्याने विकसित केलेल्या वेंटिलेटर, शुद्धीकरण टनेल, वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई), एन 95 मास्क, संपर्क मुक्त सॅनिटायझर डिस्पेंसर, सॅनिटायेशन चेंबर्स आणि मेडिकल रोबोट ट्रॉली या कोविड -19 तंत्रज्ञानाचा उपयोग या रुग्णालयात करण्यात येणार आहे.

हे सुविधा केंद्र सुरक्षा कर्मचारी, क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) आणि अक्सेस नियंत्रण प्रणाली द्वारे सुरक्षित केली जाईल. रुग्णालय एकात्मिक अग्निसुरक्षा आणि नियंत्रण प्रणालीने सुसज्ज आहे. कार्यप्रणालीच्या रचनेमध्ये पर्यावरणीय सुरक्षा आणि कचरा विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रिया यांचा समावेश आहे. कर्मचारी, नागरिक, रुग्णवाहिका आणि अग्निशमन सेवांसाठी एक मोठे वाहनतळ देखील आहे.

12 दिवसांमध्ये उभारण्यात आलेले हे रुग्णालय आजपासून सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या क्रियान्वयनामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी दिल्लीतील कोविड-19 खाटांच्या क्षमतेमध्ये अतिरिक्त 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे रुग्णालय म्हणजे, या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी डीआरडीओ, एमएचए, एमओएचएफडब्ल्यू, सशस्त्र सेना, उद्योग, दक्षिण दिल्ली महानगरपालिका (एसडीएमसी) आणि दिल्ली प्रशासन यांच्या एकत्रित सहकार्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी उपस्थित मान्यवरांना सुविधांविषयी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.