New Delhi: दिलासादायक! देशात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या प्रमाणात 27.52 टक्क्यांपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज – भारतात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली वाढ होत असल्याची दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत देशातील 42 हजार 533 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 11 हजार 707 जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. हे प्रमाण आता 27.52 टक्के झाले आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण 32.44 टक्के आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (सोमवारी)  सकाळी साडेआठ वाजताची कोरोना संबंधित आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,553 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42 हजार 533 झाली आहे. एका दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कोरोना निदान चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची वाढत असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहे.

देशात गेल्या 24 तासांत 72 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे देशातील कोरोना बळींचा आकडा 1,373 पर्यंत पोहचला आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 3.23 टक्के आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर मर्यादित ठेवण्यात भारताला यश आले आहे. कोरोनाचा जागतिक मृत्यूदर 6.96 टक्के आहे. म्हणजेच भारताचा मृत्यूदर हा जागतिक मृत्यूदराच्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाबाधित मृत आणि कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वजा करून देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या काढण्यात येते. देशातील सक्रिय रुग्णांमध्ये गेल्या 24 तासांत 1,407 ने वाढ झाली आहे. त्यामुळे आता देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 29 हजार 453 झाली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढू लागल्याने सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना संसर्ग महाराष्ट्रात झाला असून गुजरात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली, तमिळनाडू व राजस्थानचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 974 झाली आहे. त्यापैकी 548 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 115 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.