New Delhi : महाराष्ट्र राज्यात अखेर ‘राष्ट्रपती राजवट’ लागू; केंद्राच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. तसेच कोणतेही पक्ष एकत्र येऊन स्थिर सरकार स्थापन करण्यास अनुकूल नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ‘भारतीय संविधान’च्या कलम 356 नुसार ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यात यावी, या आशयाचे अहवाल वजा पत्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सन्माननीय राष्ट्रपती यांना पाठवले होते. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात तिसऱ्यांदा अशाप्रकारे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाली आहे. केंद्राच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. मात्र, असे असले तरी राज्यपाल यांनी पुरेसा वेळ दिला नसल्यामुळे शिवसेना पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाला देखील आज 8.30 पर्यंत बहुमतचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, या वेळेअगोदर केंद्राकडून अर्थात भाजपकडून ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्याची घाई केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजप हे राज्यपालांचा वापर करून घेत आहे, असाही आरोप राजकीय वर्तुळातून होत आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करणे हा अगदी शेवटचा पर्याय असताना तिसऱ्या पक्षाला दिलेल्या वेळे अगोदर ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाल्याचे जाहीर करणे, हे कितपत योग्य आहे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.