New Delhi: घाबरू नका! ‘लॉकडाऊन’मध्येही अत्यावश्यक वस्तू व औषधे मिळतील – पंतप्रधान

एमपीसी न्यूज – कोरोना निर्मूलनासाठी देशभर 21 दिवसांचा लॉकडाऊन पाळण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला असला तरी या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तू, औषधे आदी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केंद्र व राज्य शासन मिळून करणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मोठ्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे घाबरून न जाण्याचे आवाहनही मोदी यांनी देशवासीयांना केले आहे.

कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधानांनी आज मध्यरात्रीपासून 14 एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. भारताच्या इतिहासात एवढा मोठा बंद प्रथमच जाहीर झाल्याने देशवासीयांनाही मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली आहे. घरात 21 दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी किराणामालाची दुकाने, भाजी मंडई व औषधांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी वरील स्पष्टीकरण केले आहे. लॉकडाऊनच्या काळातही लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र व राज्यशासनाने स्वीकारली आहे. त्यामुळे घाबरून साठेबाजी करू नका. शांतपणे व संयमाने परिस्थितीचा सामना करावा, असे मोदी यांनी म्हटले आहे.

हा निर्णय देशातील जनतेला त्रास होण्यासाठी नाही तर तुमच्या, आमच्या, सर्वांच्या जगण्यासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी 21 दिवस घरी थांबून सहकार्य करावे, या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

दरम्यान, माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.