New Delhi: देशात कोरोना बळींची शंभरी पूर्ण, मृतांचा आकडा 109!

महाराष्ट्रात 45 तर गुजरातमध्ये 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना बळींची शंभरी पूर्ण झाली असून देशात आतापर्यंत एकूण 109 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. देशात सध्या 3,666 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून आतापर्यंत एकूण 291 रुग्ण उपचारांनंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 12 तासांत देशात कोरोनाचे नवे 490 रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 67 पर्यंत वाढली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 45 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्या खालोखाल गुजरातमध्ये 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशात नऊ बळी तर दिल्ली व तेलंगणात प्रत्येकी सात बळी, पंजाबमध्ये सहा बळी, तमिळनाडू पाच बळी, कर्नाटक चार बळी, आंध्रप्रदेश व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी तीन बळी, जम्मू-काश्मीर, केरळ आणि उत्तरप्रदेशात प्रत्येकी दोन तर बिहार, हरियाना व हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एक बळी गेल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.

कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग या वेबसाईटवरील माहितीनुसार देशातील कोरोना बळींची संख्या 118 आहे. आतापर्यंत देशात एकूण 4,289 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 3,843 असल्याचे या वेबसाईटने म्हटले आहे. एकूण 328 रुग्ण कोरोनामुक्त म्हणजेच बरे होऊन घरी गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.