New Delhi: दूरदर्शनवरील ‘रामायण’चा टीआरपी ‘गेम ऑफ थ्रोन’पेक्षाही सरस!

एमपीसी न्यूज – करोनाच्या संकटात घरात कैद असताना लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे ही मालिका दूरदर्शनवर सुरु देखील झाली. आणि चक्क एक विश्वविक्रम देखील झाला. लॉकडाऊनच्या काळात दाखवण्यात आलेली ‘रामायण’ ही मालिका हॉलिवूडच्या सर्वात जास्त टीआरपी असणा-या ‘गेम ऑफ थ्रोन’पेक्षाही सरस ठरली आहे.

रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका 1988 साली दूरदर्शनवर प्रसारित झाली. त्याकाळी रामायण सुरु झाले की रस्त्यावरची रहदारी बंद होत असे. सगळीकडे अघोषित कर्फ्यू असे. तसेच लोक टीव्हीला हार वगैरे घालत असत. या काही थापा नाहीत तर प्रत्यक्षात असेच घडत असे. आजच्या तरुण पिढीला हे काहीच माहित नाही. पण सध्या दाखवले जाणा-या रामायणाने आत्तादेखील रेकॉर्ड केले आहे.

‘गेम ऑफ थ्रोन’ हा हॉलिवूडचा अत्यंत यशस्वी असा गेम शो आहे. तरुणाई या शोच्या मागे वेडी आहे. त्याच्या फिनालेच्या दर्शकांचे रेकॉर्ड आहे. पण भारतीय रामलल्लाने मात्र या गेमवर मात केली.  गेम ऑफ थ्रोनच्या फिनालेला जेवढी लोकप्रियता मिळाली त्याच्या तुलनेत जास्त लोकप्रियता रामायणाच्या पुनप्रसारणाला मिळाली.  रामायण 17 एप्रिल या दिवशी सुमारे 7.7 कोटी लोकांनी पाहिले. गमतीची गोष्ट म्हणजे रामायण जेव्हा पहिल्यांदा प्रसारित झाले तेव्हा ज्यांचा जन्मदेखील झाला नव्हता अशा तरुण पिढीने ही मालिका सर्वात जास्त पाहिली.

रामायण या मालिकेत अरुण गोविल यांनी राम, दीपिका चिखलिया यांनी सीता, सुनील लाहिरी यांनी लक्ष्मण, अरविंद त्रिवेदी यांनी रावण साकारला होता. सध्याच्या पिढीला यातील कोणीही कलाकार माहित नाहीत. पण टीव्हीच्या इतिहासात पहिल्यांदाच देशातील तरुण पिढी रामायण पाहात आहे आणि त्यातील संदर्भांचा अर्थ लावत आहे. एवढेच नाही तर सोशल मिडीयावर त्यासंबंधी ट्वीट पण करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.