New Delhi : सचिनच्या 100 शतकांचा विक्रम विराट कोहली मोडू शकेल – ब्रेट ली 

एमपीसी न्यूज – भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी चोवीस वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये मिळून शंभर शतकांचा विक्रम केला आहे.  हा विक्रम येत्या सात ते आठ वर्षात भारताचा अव्वल क्रिकेटपटू विराट कोहली  मोडू शकेल,  असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि व्यक्त केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ब्रेट ली म्हणाला, विराट कोहली पुढचे सात ते आठ वर्ष आपल्या बॅटने करिष्मा दाखवतच राहील.  विराटमध्ये त्याला अव्वल क्रिकेटपटू बनवणाऱ्या सर्वच गोष्टी आहेत. विराटमध्ये चांगले कौशल्य तर आहेच त्याचबरोबर मानसिक संतुलन आणि चांगला शारीरिक फिटनेस देखील आहे. सचिन हा तर सर्वोत्तम खेळाडू होताच पण विराट कोहलीचा येणारा काळ निश्चित चांगला असणार आहे.  त्यामुळे  येत्या काळात काय घडेल याबद्दल निश्चित उत्सुकता राहणार आहे.

ब्रेट ली पुढे म्हणाला, आपण जर आकडेवारी बघितली आणि ज्या पद्धतीने सध्या विराट कोहली खेळत आहे तर येत्या सात ते आठ वर्षात विराट कोहली निश्चितच सचिनचा विक्रम मोडून काढेल यात शंका नाही.

सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके ठोकली आहेत तर टेस्ट क्रिकेटमध्ये 51 शतके  ठोकली आहेत, असे मिळून शंभर शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. तर विराट कोहली याने 86 टेस्ट मॅचेसमध्ये 27,  तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 248 सामान्यांमध्ये 43 शतके ठोकली आहेत. त्यामुळे विराट सचिनच्या विक्रमाच्या जवळ असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान,  एकदा सचिनला विचारलेल्या तुझा विक्रम कोण मोडू शकेल? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यानेसुद्धा विराट कोहलीचे नाव घेतले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात विराट कोहली सचिनचा विक्रम मोडू शकेल का, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.